शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर सवलत योजनेची सुरुवात लवकरच होणार

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागासांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जात आहे. विविध बँकांनी व्यवसायाकरित्या ७० हजार लाभार्थ्यांना एकूण ५ हजार १४० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले. यातील ५८ हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने ५६७ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्याज परतावा केला आहे. ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे. ही योजना दसऱ्यापासून सुरू होईल. याबाबतची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. ते मंत्रालयाच्या विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने, महामंडळाने १० हजार ते २ लाख रुपयांच्या मर्यादेतील लघु कर्ज व्याज परतावा योजना आणि शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना अशा दोन नवीन योजना प्रस्तावित केल्या आहेत. या योजनांमुळे मराठा समाजातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल. महामंडळाने राज्यातील गावपातळीपर्यंत जाऊन त्याच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी जिल्हानिहाय दौरे आणि मेळावे आयोजित केले आहेत. ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देऊन गरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महामंडळाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यासोबतच महामंडळाने उपसमितीमध्येही ही बाब मांडली आहे. महामंडळाच्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर विशेष सवलत मिळावी यासाठी महामंडळाने संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

1) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 15 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

2) 3 लाख रुपयांच्या मर्यादेत देण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा 4.5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे कर्जाचा कालावधी 5 वर्षांवरून 7 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

3) महामंडळाच्या योजनांमध्ये सर्वाकरिता वयोमर्यादेची अट 60 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे.

4) शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रेरणा घेऊन ‘महामंडळ आपल्या दारी’ योजनेची सुरुवात

5) राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये दौरे आणि लाभार्थी संवाद मेळावे

6) लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजना आणि सुविधांबाबत माहिती

7) लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने बँक ऑफ इंडियाशी सामंजस्य करार

8) पुढील काळात राज्यातील सर्व सीएससी सेंटरशी सामंजस्य करार

Leave a Comment