WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Transport: ऊस वाहतूक वाहनांना ‘हे’ न केल्यास होणार कारवाई

सोलापूर जिल्ह्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाढत्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ग्रामीण पोलिस विविध उपाययोजना करत आहेत. त्यात वाहतूक नियमांची जनजागृती आणि प्रचार प्रसार केले जात आहे. सध्या साखर कारखाने सुरू झाल्यामुळे रस्त्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने वाढली आहेत. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पुढे आणि मागील बाजूस रेडिअम, रिफ्लेक्टर लावावे असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने चालू कारखान्यांमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रेलर, ट्रक, बैलगाडी व इतर सर्व वाहनांना लाल पांढरे रिफ्लेक्टर लावून घेण्याबाबत सूचना देण्यात आले आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिसू शकतील आणि अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. सर्व वाहनांची कागदपत्रे अद्ययावत असतील याची खात्री करावी.

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. यासाठी साखर कारखानदारांनी वाहन चालक व मालक यांना सूचना देण्यात याव्यात असेही वाहतूक शाखेने सांगितले आहे. तसेच ऊस वाहतूक वाहन चालकांनी आपल्या वाहनावर रिफ्लेक्टर व रेडिअम लावावे.

मागील वर्षी गळीत हंगामात पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना सुरक्षितता वाढवण्यासाठी रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम राबविण्यात आली होती. तसेच १४ हजार ३३४ एवढ्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले या मोहिमेमुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. तसेच यावर्षीही वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने आणि संबंधित पोलिस ठाण्याने साखर कारखाना स्थळावर जाऊन वाहन चालक आणि मालक यांना प्रबोधन केले होते. चालू वर्षी सर्व साखर कारखान्यांना याबाबत सूचनापत्र सूचनापत्र दिले असून रिफ्लेक्टर लावण्याची विशेष मोहीम ११ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू करण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले.

Leave a Comment