रब्बी हंगामात हरभरा पिकाची वाढ सुरू झाली आहे. काही ठिकाणी पीक वाढीच्या टप्प्यात आहे, तर बहुतांश ठिकाणी पीक फुलोरा अवस्थेत आहे. या काळात घाटे अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड आहे. या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर आणि फुलांवर अंडी घालते. ती अंडी खसखसीच्या दाण्यासारख्या दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसात ती अळी बाहेर पडते.
ही अळी पानावरील हरितद्रव्य खरडून खाते त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढरकी होऊन वाळतात आणि नंतर गळून पडतात. अळी फुले आणि घाटे देखील खाते. यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कीड हरभरा पिकाच्या कोवळ्या पानांवर, देठावर, फुलांवर आणि घाट्यांवर मोठ्या प्रमाणात नुकसान करते.
थोड्या मोठ्या झालेल्या घाटेअळी संपूर्ण पाने आणि कोवळ्या देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतो आणि पीक फुलोऱ्यावर आल्यावर या अळीचा प्रादुर्भाव वाढतो. या अळ्या प्रामुख्याने घाट्यांचे आणि फुलांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करतात आणि आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणत 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करते. घाटेअळीच्या प्रादुर्भावामुळे हरभरा पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही कमी होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
तुमच्या पिकाचे निरीक्षण करून, किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपर्यंत (१ ते २ अळ्या प्रति मिटर ओळ) पोहोचला आहे का ते तपासा किंवा तुमचे पीक ४० ते ५० टक्के फुलोऱ्यावर आले आहे, तर घाटेअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील दोन फवारण्या १० लिटर पाण्यात मिसळून करा.
पहिली फवारणी (50 टक्के फुलोरावर असतांना)
फवारणीसाठी निंबोळी अर्क ५ टक्के, एच.ए.एन.पि.वि (१x१० पिओबो/मि.ली.) ५०० एल.ई./हे. किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी २० मि.ली. यापैकी कोणतेही वापरता येते.
दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर15 दिवसानंतर)
पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. या फवारणीसाठी इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एस जि ३ ग्रॅम, ईथिऑन ५० टक्के ईसी २५ मि.ली., फ्ल्यूबेंडामाईड २० टक्के डब्ल्यूजी ५ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनिलिप्रोल १८.५ टक्के एस. मी, २.५ मि.ली. यापैकी कोणतेही औषध वापरू शकता. किटकशास्र विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला