पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांची नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेचा पहिला हप्ता गुरुवारी [दि. २६] शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारने नमो किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि आधार जोडणी करणे आवश्यक आहे. हे काम अजूनही सुरू असल्याने, पीएम किसानच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात आली आहे. या यादीतील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळेल.
नमो किसान सन्मान योजनेसाठी राज्यात स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रविवारी जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या यादी अंतिम केल्या जातील. राज्य सरकारने योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी सोमवारी संबंधित बँकांकडे वितरित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डी येथे योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित करतील. त्यामुळे यादी अंतिम करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, पीएम-किसान योजनेतील लाभार्थी संख्येच्या तुलनेत नमो किसान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी नसेल.